छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीतील कवी, गायक, शाहीर, प्रबोधनकार आणि कलावंतांचा ‘महाराष्ट्रातील आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे शिलेदार’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपासक-उपासिका, कलाकार आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
चळवळीचे ढाण्या वाघ पॅंथर विशाल इंगळे आणि पॅंथर विजय वाहूळ यांनी कलाकारांना एका मंचावर आणत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोधाची भूमिका ठामपणे मांडली. महाराष्ट्रातील कलाकारांची आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
पॅंथर विशाल इंगळे यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “येथून पुढे चळवळीच्या कवी-गायकांनाच कार्यक्रमांमध्ये संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. चळवळीच्या विचारांसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर कला सादर करणाऱ्या आपल्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. काही गायक नुसते पैसे कमावण्यापुरते बाबासाहेबांचे नाव घेतात, गाणी गातात. अशा गद्दारांना वेळीच ओळखा आणि अशांना इथून पुढे चळवळीचे कार्यक्रम देऊ नका, अशा स्पष्ट सूचना आयोजकांना आणि समाजाला देत आहोत.”
त्यानंतर पॅंथर विजय वाहूळ यांनी कार्यक्रमाची संपूर्ण भूमिका आणि कलाकारांची उपवर्गीकरणा विरोधातील ठाम भूमिका उपस्थितांसमोर मांडली. ते म्हणाले, “आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावावर सध्या जे राजकारण सुरू आहे आणि एकमेकांवर जी चिखलफेक सुरू आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. वास्तविक ५९ जातींमध्ये सर्वकाही अबाधित आहे. बोटावर मोजण्याइतकेच काही लोक एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. शासनाला आमची स्पष्ट सूचना आहे की, कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचे उपवर्गीकरण होता कामा नये.”
कार्यक्रमाचे सर्वांचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वामनदादांचे शिष्य नागसेन दादा सावदेकर यांनी ‘जागा असावं भीमाचे पिल्लू जागा असावं’ हे बहारदार भीमगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या दमदार सादरीकरणाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी-गायक सुनील दादा खरे यांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी-गायक शाहीर विजय मोकळे करंजगावकर यांनी स्वतः लिहिलेले अतिशय मार्मिक भीमगीत सादर करून श्रोत्यांची मनं जिंकली. यावेळी आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, “कवी-गायकांनी एकमेकांच्या विरोधात काहीही लिहू नये, चिखलफेक करू नये. कवी आणि गायकांनी नैतिकता बाळगावी, जे वास्तविक आहे तेच लिहावे. जे आमच्यातच राहून आम्हालाच विरोध करतात, त्यांच्यासाठी मी माझ्या ‘शाल जोडीत’ या गीतातून मार्मिक विवेचन केले आहे.”
यावेळी सुप्रसिद्ध कवी-गायक मेघानंद जाधव, भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे, राजाभाऊ शिरसाट, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे, सुप्रसिद्ध गायिका सपना खरात, प्रा. डॉ. किशोर वाघ, कुणाल वराळे, अस्मिता खरात, गुणगुण येवले, संतोष मोरे, संतोष चव्हाण, राजेश, ‘कष्ट केलेत माझ्या भिमाने’ फेम अजय देहाडे, प्रदीप पठारे यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कवी, गायक आणि कलाकार याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी कला सादर केली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते दिनकर दादा ओंकार, भीमशक्तीचे संतोष भिंगारे, विजय मगरे, राजू भाई साबळे, देविदास येवले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपासक-उपासिका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खरात यांनी प्रभावीपणे केले. गीत, काव्य, शाहिरी आणि प्रबोधनाच्या माध्यमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन पॅंथर विशाल इंगळे, पॅंथर विजय वाहूळ तसेच समस्त भीमसैनिकांनी केले होते. कलाकारांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आयोजकांनी महाराष्ट्रातील हजारो कलाकारांना एकाच मंचावर आणत आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीची ताकद दाखवून दिली.
हजारो कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम कलाकारांच्या एकजुटीचा आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधातील भूमिकेचा बुलंद आवाज ठरला.
