उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चाकू हल्ल्याचा गुन्हा उघडकीस
पुणे/महाळुंगे : जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तरुणाच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या चार तासांत ताब्यात घेतले. पारंपरिक तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ही कारवाई केली.
दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहुल शामकुमार निषाद (वय २३, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. विद्यांचल, ता. कटरकोतवाली, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) हा जावळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना महाळुंगे स्मशानभूमीजवळ आरोपी ओग चंद्रकांत बहादुरे व अनिल रामराव आघाडे यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपींनी राहुलच्या गळ्यावर व हातावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
या घटनेप्रकरणी राहुल निषाद यांच्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने पारंपरिक तपासाबरोबरच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. गुन्हा करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा पाठलाग करून पोलिसांनी चार तासांच्या आत दोघांना ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर व सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
