सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश; १६ डिसेंबरला सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश
ईश्वरपूर प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील नेरले गावातील दोन तरुणांना बेदम मारहाण करून नग्न अवस्थेत नेल्याच्या गंभीर प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना समन्स बजावून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले असून, १६ डिसेंबर २०२६ रोजी सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले आहेत. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.३० च्या दरम्यान बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिम बाजूस प्रणव धनाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील हे दोघे शेतातील नदीवरील पाण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या वायरमनची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यानंतर काही वेळातच चारचाकी वाहनातून आणखी दोन व्यक्ती घटनास्थळी दाखल झाल्या.
संबंधित व्यक्तींनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता दोन्ही तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. विनाकारण मारहाण का करता, असा जाब विचारल्यानंतरही मारहाण थांबविण्यात आली नाही. उलट दोघांना फरफटत सिमेंट रस्त्यावरून नेण्यात आले. त्यांचे कपडे फाडून त्यांना नग्न करण्यात आले. त्यानंतर जखमी अवस्थेतील दोन्ही तरुणांना वाहनातून नरसिंगपूरच्या दिशेने नेण्यात आले. त्यापैकी प्रणव पाटील याला नग्न व जखमी अवस्थेत तांबवे येथील शेतकरी सुशांत पाटील यांच्या वस्तीवर नेण्यात आले. यावेळी संबंधित चौघांनी आपण ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस असल्याचे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी संबंधित चार पोलिसांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी २० मे २०२६ रोजी राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे याचिका दाखल केली.
या याचिकेची आयोगाने गंभीर दखल घेत सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना समन्स बजावले असून, संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १६ डिसेंबर २०२६ रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रकरणात कायदेविषयक सल्लागार अॅड. संतोष कदम, सांगली जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा निरीक्षक नितीन फल्ले, वाळवा तालुकाध्यक्ष गोरख पल्ले, ईश्वरपूर शहराध्यक्ष मिलिंद आढाव, तालुका उपाध्यक्ष कुमार खोत, तालुका निरीक्षक संजय कबुरे आणि ईश्वरपूर शहर उपाध्यक्ष अक्षय जाधव यांनी सहकार्य केले.
मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपांवर आयोगाने अहवाल मागविल्याने संबंधित प्रकरणात आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
