पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला
भोसरी प्रतिनिधी: भोसरीतील गळवे वस्ती परिसरातील साम्राज्य इंडस्ट्रीज येथे असलेल्या नमो स्टील या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून सुमारे १ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २० नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. भोसरी येथील गळवे वस्ती, सर्व्हे क्रमांक २४ मधील साम्राज्य इंडस्ट्रीज परिसरातील पाच नंबरच्या पत्र्याच्या शेडमध्ये नमो स्टील हे दुकान आहे.
अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, पितळ तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर असा एकूण १ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेला.
याप्रकरणी महेंद्र कालिदास कांकरीया (वय ४३, व्यवसाय स्टील व्यावसायिक, रा. भवानी पेठ, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.