महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर
पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीने यंदा नवा विक्रम नोंदविला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या सहामाहीतील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाने दिली.
शहरातील ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० नागरिकांनी म्हणजेच ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी सहा महिन्यांत कर भरला आहे. विविध कर सवलती, जनजागृती मोहीम, नोटीस बजावणी, जप्ती कारवाई, थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे, महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच बिलवाटप तसेच एसएमएसद्वारे कर व सवलतीची माहिती देण्याचा उपक्रम यामुळे वसुलीत वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
गतवर्षी सप्टेंबरअखेर ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी ६०३ कोटी ८२ लाख रुपयांचा कर भरला होता. यंदा सहामाहीतच ६१० कोटी ४४ लाख रुपयांची वसुली झाली असून, गतवर्षाच्या तुलनेत ६ कोटी ६२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती
महापालिकेच्या ऑनलाइन कर भरणा सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सहा महिन्यांत ४ लाख ४५ हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाइन पद्धतीने ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा कर भरला आहे. घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ऑनलाइन माध्यमाचा वापर वाढला आहे.
वाकड करसंकलन कार्यालय आघाडीवर
महापालिकेच्या १८ करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये वाकड कार्यालयाने सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली केली. त्यानंतर थेरगाव ५३ कोटी १५ लाख, कस्पटे वस्ती ४५ कोटी १९ लाख, पिंपरी नगर ४४ कोटी ९९ लाख, किवळे ४४ कोटी ९१ लाख, चिखली ४४ कोटी ६१ लाख, तर तळवडे कार्यालयाने ११ कोटी ९९ लाख रुपयांची वसुली केली.
चार वर्षांतील सहामाही वसुली
•२०२३-२४ : ५९० कोटी ६० लाख
•२०२४-२५ : ५१२ कोटी ६२ लाख
•२०२५-२६ : ६०३ कोटी ८२ लाख
•२०२६-२७ : ६१० कोटी ४४ लाख
निवासी मालमत्ता धारकांची आघाडी
सहा महिन्यांत कर भरणाऱ्यांमध्ये निवासी मालमत्ता धारकांची संख्या सर्वाधिक आहे. निवासी ४ लाख ५१ हजार ७३९, बिगरनिवासी ४० हजार १९७, मिश्र १० हजार ४४, औद्योगिक ३ हजार ६६७ आणि मोकळ्या जमिनीच्या ३ हजार ४८९ मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.
“मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या सहामाहीत प्रथमच ६१० कोटींचा कर जमा झाला आहे. कर भरून शहर विकासात योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार. यापुढील काळात थकबाकीदार मालमत्तांकडून कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार आहे.”
…..आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी.पिं.चिं.मनपा.
“१८ करसंकलन विभागीय कार्यालयांचे उद्दिष्टनिहाय नियोजन करून कार्यालयनिहाय प्रगती, थकबाकीदार मालमत्ता आणि वसुलीचा नियमित आढावा घेण्यात आला. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे वसुलीची दिशा निश्चित केल्याने यंदा विक्रमी कर संकलन शक्य झाले”
…..अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर.पि.चिं.मनपा.
“करदात्यांना सवलतीचा लाभ घेता यावा आणि कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. त्यामुळे सहा महिन्यांत ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. पुढील सहा महिन्यांत उर्वरित मालमत्ता धारकांकडून कर संकलनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर आणि चालू कर १०० टक्के वसूल करणे हेच ध्येय आहे.”
…..उपायुक्त सचिन पवार.पिं. चि. मनपा.
