रवींद्र चव्हाण यांची घोषणा; अनुप मोरेंचा कामगारांच्या न्यायासाठी लढण्याचा निर्धार
पिंपरी, प्रतिनिधी : माथाडी कामगारांचे संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने चिंचवडमध्ये भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात संघटनेने महाराष्ट्रात ५० हजार सभासद नोंदणीचे लक्ष्य निश्चित केले. सध्या संघटनेचे सुमारे १५ हजार सदस्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कामगारांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. जुन्या कामगार कायद्यांमुळे कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन कामगार कायद्यांच्या चौकटीत सामाजिक सुरक्षा आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मिळण्यास मदत होत असल्याचेही चव्हाण म्हणाले.
“अनुप मोरे यांच्यासारखा युवा कार्यकर्ता राज्यातील माथाडी कामगारांचे नेतृत्व सक्षमपणे करीत आहे. अल्पावधीत १५ हजार सदस्यांची नोंदणी झाली असून ही कौतुकास्पद बाब आहे. ५० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजप कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहील,”
……..रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष
मेळाव्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. “२०१४ मध्ये संघटनेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात १५ हजार कामगारांची सदस्य नोंदणी झाली आहे. आता ५० हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवून काम करीत आहोत. कामगारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि कामगारांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढत राहू,” असे मोरे यांनी सांगितले.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमाताई खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक तुषार हिंगे, संघटनेचे अध्यक्ष विजय हरगुडे, जयदीप खापरे, संतोष दाभाडे, अक्षय वरघडे, राकेश सणस, वसीम शेख यांच्यासह हजारो माथाडी कामगार उपस्थित होते.
मेळाव्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघटनेच्या लोगोमध्ये राष्ट्रमातेचा समावेश असून ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून काम करण्याचा संदेश देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रास्ताविक ॲड. विजय हरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी, तर आभार संतोष कांबळे यांनी मानले.
