११ लाख ९५ हजारांचा औषधसाठा गुणवत्तेच्या निकषांत अपात्र; उत्पादक कंपनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत, पुरवठादारावरही कारवाई
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वाय.सी.एम.) औषधसाठ्याच्या गुणवत्तेबाबत प्रसारित झालेल्या वृत्तानंतर महापालिका प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. वाय.सी.एम. रुग्णालयात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कोणतीही छापेमारी केलेली नसून, औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेत संबंधित औषधसाठा तपासणीसाठी FDA कडे पाठविला होता, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘Cap. B-Complex with Zinc (CareZinc)’ या औषधाच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी महापालिकेने FDA कडे पत्रव्यवहार करून औषधांची तपासणी करण्याची विनंती केली. तपासणी होईपर्यंत संबंधित औषधांचा वापर थांबवून साठा बाजूला ठेवण्यात आला होता.
FDA ने १६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या अहवालात संबंधित औषध ‘Not of Standard Quality‘ अर्थात निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे स्पष्ट केले. या अहवालानंतर महापालिकेने ८ सप्टेंबर रोजी संबंधित उत्पादक कंपनी ‘Inducare Pharmaceuticals and Research Foundation’ हिला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले. तसेच पुरवठादार ‘मे. श्रीविनायक फार्मा, पुणे’ यांच्यावरही तीन वर्षांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
दरम्यान, संबंधित पुरवठादारामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या आणखी प्रकारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ११ प्रकारची औषधे गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ४ नोव्हेंबर २०२६ रोजी FDA ने या ११ प्रकारच्या औषधांचा साठा तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला.
१ कोटी ७२ लाखांचा साठा नव्हे, प्रत्यक्ष किंमत ११.९५ लाख!
या प्रकरणात औषधसाठ्याच्या किमतीबाबतही महापालिकेने महत्त्वाचा खुलासा केला आहे. काही वृत्तांमध्ये १ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ रुपयांचा औषधसाठा जप्त केल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, FDA ने ताब्यात घेतलेल्या ११ प्रकारच्या औषधसाठ्याची प्रत्यक्ष किंमत ११ लाख ९५ हजार ८६३ रुपये असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या औषधसाठ्यापोटी महापालिकेने संबंधित पुरवठादाराला कोणतीही रक्कम अदा केलेली नसल्याचेही प्रशासनाने सांगितले.
छापेमारीच्या वृत्ताचे महापालिकेकडून खंडन
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी स्पष्ट केले की, FDA कडून कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नाही. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यानंतर महापालिकेने स्वतःहून तपासणीसाठी पुढाकार घेतला होता. रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन औषधांचा वापर रोखण्यात आला आणि तपासणी अहवालानुसार कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनीही या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करताना सांगितले की, औषधांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी महापालिकेने FDA कडे पाठपुरावा केला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उत्पादक कंपनी आणि पुरवठादाराविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या या स्पष्टीकरणामुळे औषधसाठा जप्तीच्या वृत्तातील छापेमारीचा मुद्दा स्पष्ट झाला असला, तरी रुग्णालयात पुरवठा झालेल्या औषधांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित औषधांच्या खरेदीपासून पुरवठा आणि गुणवत्ता तपासणीपर्यंतच्या प्रक्रियेवर अधिक काटेकोर नियंत्रण ठेवण्याची गरज या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे.
