२४२ किलो तांब्याच्या तारांसह कार असा १०.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्हे उघडकीस
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतीपंपांसाठी उभारण्यात आलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी/रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत २४२ किलो तांब्याच्या तारा आणि एक ईर्टिगा कार असा एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून चौकशीदरम्यान चार गुन्हे उघडकीस आले असून, या चारही गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयाच्या ग्रामीण भागात शेतीपंपांसाठी उभारलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी/रोहित्रांमधून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले होते.
त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तपास सुरू केला. दरम्यान, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे आणि पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना चोरी केलेल्या तांब्याच्या तारांची विक्री करण्यासाठी आरोपी जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, गणेश कोकणे, चंद्रकांत गडदे, गणेश हिंगे, अमर कदम आणि अमोल गोरे यांच्या पथकाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड फूड प्लाझा येथे सापळा रचला.
यावेळी पांढऱ्या रंगाच्या ईर्टिगा कारमधून चोरी केलेल्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शहा (वय २८), मैनुद्दीन खलील शहा (वय ३५) आणि सुफियान जमीरउल्ला खान (वय १९) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून २४२ किलो तांब्याच्या तारा व ईर्टिगा कार, असा एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात दक्षिण चाकण पोलीस ठाणे येथील दोन तर उत्तर चाकण पोलीस ठाणे येथील दोन असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहे.या चारही गुन्ह्यांतील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, गणेश कोकणे, पवन वाजे, विनोद वीर, हर्षद कदम, समिर रासकर, अमर कदम, मोहसीन अत्तार, अमोल गोरे, अशोक मरळ, गणेश सावंत आणि ज्ञानेश्वर कोळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
