कोट्यात १.४० कोटींच्या मशीनचा दावा; पिंपरी-चिंचवडमध्ये २.७७ कोटींचे अंदाजित मूल्य का?
निविदा स्थगित करून चौकशीची संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी काढण्यात आलेल्या GeM निविदा क्र. GEM/2026/B/7797530 मधील 1000 MA Digital Radiography System (डिजिटल एक्स-रे मशीन)च्या खरेदीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मशीनसाठी महापालिकेने तब्बल २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये इतके अंदाजपत्रकीय मूल्य निश्चित केल्याचे समोर आले आहे. मात्र, इतर शासकीय संस्थांमधील कथित खरेदी दरांच्या तुलनेत हा दर अधिक असल्याचा दावा नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर वाघेरे यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले असून, संबंधित निविदा प्रक्रिया तातडीने स्थगित करून रद्द करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोट्यात १.४० कोटींच्या खरेदीचा दावा
वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, निविदेतील तांत्रिक स्पेसिफिकेशनशी संबंधित मूळ उत्पादक कंपनीने राजस्थानातील कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला 1000 MA क्षमतेचे याच प्रकारचे मशीन सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांना पुरविल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 800 MA क्षमतेचे मशीन याच वर्षी सुमारे १ कोटी १० लाख रुपयांना विकण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे एका बाजूला 1000 MA क्षमतेच्या मशीनची शासकीय संस्थेतील खरेदी सुमारे १.४० कोटी रुपयांत झाल्याचा दावा आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निविदेत त्याच क्षमतेच्या मशीनसाठी २.७७ कोटी ५६ हजार रुपयांचे अंदाजित मूल्य निश्चित केल्याने दरातील मोठ्या फरकाचे कारण काय?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
तांत्रिक स्पेसिफिकेशनवरही आक्षेप
संबंधित निविदेतील काही तांत्रिक अटी व स्पेसिफिकेशन विशिष्ट कंपन्या किंवा पुरवठादारांना अनुकूल ठरतील अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्याचा आरोपही वाघेरे यांच्या पत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळे निविदेतील प्रत्येक तांत्रिक निकष, अंदाजपत्रकीय दर तसेच दर निश्चित करण्यासाठी वापरण्यात आलेले बाजारभाव यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित उत्पादक कंपनीच्या काही सरकारी संस्थांमधील विक्री व्यवहारांबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, महापालिका प्रशासनाने खरेदी प्रक्रियेत विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार नको’
महापालिकेच्या सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदी केली जात असल्याने निविदा प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक आणि वस्तुनिष्ठ बाजारभावाच्या आधारे होणे आवश्यक आहे. त्यामुळे GEM/2026/B/7797530 ही निविदा तत्काळ स्थगित करून रद्द करावी, संबंधित मशीनच्या पूर्वीच्या शासकीय खरेदी दरांची पडताळणी करावी आणि नव्याने बाजारभाव निश्चित करूनच पुढील खरेदी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.
दरम्यान, २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपयांचे अंदाजित मूल्य कोणत्या बाजारभावाच्या आधारे निश्चित करण्यात आले?, तसेच कोटा येथील कथित १.४० कोटी रुपयांच्या खरेदीदराशी तुलना केल्यास निर्माण होणाऱ्या फरकाचे कारण काय, याबाबत महापालिका प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.
