पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात; पिकांचे पंचनामे, पाणी, चारा व रोजगाराच्या उपाययोजनांची मागणी
वैजापूर प्रतिनिधी विजयकुमार मोकळे : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने आणि मागील काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने वैजापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये जमिनीला भेगा पडल्या असून, शेतातील उभी खरीप पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्री. महाजन यांची भेट घेऊन तालुक्यातील पावसाची तूट, खरीप पिकांची सद्यस्थिती, पाणीटंचाई तसेच ग्रामीण भागातील नागरिक व पशुधनासमोरील अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
तातडीने पंचनामे करण्याची मागणी
तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील पावसाची अधिकृत आकडेवारी, पावसातील खंड, पाणी उपलब्धता आणि पिकांची स्थिती यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.
पाणी, चारा आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर
पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये परिस्थितीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जनावरांसाठी पुरेसा चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावोगावी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई तसेच शासनाच्या लागू असलेल्या दुष्काळी योजनांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा. शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना शासनाच्या सर्व उपलब्ध सवलती व मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप हंगाम पूर्णपणे हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री आढावा न घेता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी, पंचनामे आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर विजय मोकळे करंजगावकर, बाळासाहेब गायकवाड, महेंद्र सोनवणे, रमेश त्रिभुवन आणि विलास पठारे बोरसर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
