शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापौर निवास उभारण्याची शिवप्रेमींची आग्रही मागणी; निर्णयाचा फेरविचार न झाल्यास आंदोलनाचा इशारा
निगडी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी प्राधिकरण परिसरातील शिवजयंती उत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेली मोकळी जागा महापौर निवासासाठी देण्याच्या निर्णयाला शिवप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शिवजयंतीची पारंपरिक जागा कोणत्याही परिस्थितीत महापौर निवासासाठी देऊ नये आणि महापौर निवास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावा, अशी आग्रही मागणी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, निगडी तसेच शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर महापौर निवासस्थान उभारण्यासाठी नुकत्याच झालेल्या महापालिका तसेच स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
मात्र, याच जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भक्ती शक्ती शिवजयंती महोत्सव समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य महानाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सार्वजनिक उपक्रम आयोजित केले जातात. तसेच शहरातील विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठीही या जागेचा वापर केला जातो.
भक्ती शक्ती समूह शिल्पाजवळील ही जागा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेली परिसरातील एकमेव मोठी जागा असल्याचा दावा शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. या जागेव्यतिरिक्त परिसरात अशा स्वरूपाचे मोठे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने महापौर निवासासाठी हा भूखंड वापरण्याचा निर्णय तातडीने पुनर्विचारात घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापौर निवासासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यायी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. मात्र, शिवजयंती, महापुरुषांच्या जयंती आणि सार्वजनिक सांस्कृतिक उपक्रमांसाठी वर्षानुवर्षे वापरात असलेली जागा कायमस्वरूपी बंदिस्त करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शिवप्रेमींनी मांडली.
याबाबत भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शहर अभियंता मनोज सेठिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे महापौर निवासाचा प्रस्तावित निर्णय रद्द करून संबंधित जागा शिवजयंती व अन्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली.
“शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्षानुवर्षे वापरली जाणारी जागा कोणत्याही परिस्थितीत महापौर निवासासाठी देऊ नये. महापौर निवास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावा. अन्यथा शिवप्रेमी नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला.
या निवेदनावर मारुती भापकर, सचिन चिखले, चेतन पवार, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते, रोहिदास शिवणेकर, हौशेराव शिंदे, प्रबुद्ध कांबळे, सतीश काळे, वैभव जाधव, वसंत पाटील, सखाराम इक्के आणि आबासाहेब ढवळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
