यशवंतभाऊ भोसले यांच्या मागणीला महापौरांचा प्रतिसाद; किमान १५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी, आर्थिक गणित तपासण्याचे प्रशासनाला निर्देश
पिंपरी (प्रतिनिधी), दि. ६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मागणीला महापौर रवी लांडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कंत्राटी कामगारांना किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देता येईल का, याचे आर्थिक गणित तपासण्याचे निर्देश महापौरांनी मुख्य लेखापरीक्षकांना दिले आहेत.
यासंदर्भात शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता महापौर कार्यालयात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आणि महापौर रवी लांडगे यांच्यात बैठक झाली. यावेळी कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य लेखापरीक्षकांनी आर्थिक बाबींचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौरांनी दिले असून, त्यानंतर सायंकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्याचे संकेत त्यांनी दिले.
महापौर रवी लांडगे म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न यशवंतभाऊ भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा करून आमच्यासमोर मांडला. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी ते अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. काही कामगारांच्या मासिक वेतनात वाढ करून त्यातून वर्षाला जवळपास १८ ते १९ हजार रुपये बोनसच्या स्वरूपात मिळण्याची व्यवस्था झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा आणि अन्य विभागांमध्ये जवळपास दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यापासून आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेपर्यंत विविध महत्त्वाच्या सेवा हे कामगार प्रामाणिकपणे बजावतात. त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून दिवाळीनिमित्त त्यांना जास्तीत जास्त सानुग्रह अनुदान देता यावे, यासाठी महापालिका सकारात्मक प्रयत्न करेल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
दरम्यान, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, महापौर रवी लांडगे यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत दाखवलेली संवेदनशीलता स्वागतार्ह आहे. यापूर्वी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेक मोर्चे आणि आंदोलने करावी लागली; मात्र यावेळी महापौरांनी स्वतः सकारात्मक भूमिका घेतली आहे.
काही कंत्राटदार कामगारांच्या वेतनपत्रकात बोनसची स्वतंत्र नोंद करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक कामगाराला बोनस मिळाला आहे की नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे. ज्या कंत्राटदारांनी बोनसची रक्कम दिलेली नाही, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून संबंधित कामगारांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महापालिकेचे कंत्राटी कामगार कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच, किंबहुना अनेकदा अधिक कष्टाची कामे करतात. शहराच्या अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टांचा सन्मान म्हणून प्रत्येक कंत्राटी कामगाराला किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी भोसले यांनी केली.
महापौरांनी सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्याचे संकेत दिल्याने आता महापालिका प्रशासनाच्या आर्थिक अहवालाकडे आणि अधिकृत घोषणेकडे सुमारे दहा हजार कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे. कामगारांच्या दिवाळीत गोडवा निर्माण होणार की केवळ आश्वासनावरच समाधान मानावे लागणार, याचा फैसला आता महापौरांच्या घोषणेतून होणार आहे.
