आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक
पुणे, कोथरूड (प्रतिनिधी) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कोथरूड आगारातील चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे बसमध्ये विसरलेले प्रवाशाचे पाकीट सुखरूप परत मिळाले. कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
मार्ग क्रमांक १४४/३ वरील बस क्रमांक ६७८ मधून गुलाब गणपत तिकोणे (माजी न्यायालयीन कर्मचारी) हे गणपती माथा येथून मंडई, सिटी पोस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात जाण्यासाठी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते इच्छित बसथांब्यावर उतरले; मात्र घाईगडबडीत त्यांचे पाकीट बसमध्येच राहिले.
दरम्यान, वाहक विशाल भोसले यांच्या निदर्शनास हे पाकीट आले. त्यांनी तत्काळ चालक गणेश बन्सीधर कदम यांना याची माहिती दिली. पाकिटाची तपासणी केली असता त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना आणि १ हजार २५० रुपये रोख रक्कम असल्याचे आढळले.
चालक गणेश कदम यांच्या सूचनेनुसार पाकिटातील संपर्क क्रमांक शोधण्यात आला. त्यामध्ये गुलाब तिकोणे यांचे मित्र दत्तात्रय मारुती भोसले यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांच्याशी संपर्क साधून पाकीट बसमध्ये विसरल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर तिकोणे यांच्याशी संपर्क झाला.
तिकोणे यांनी वाहक विशाल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पाकीट सुरक्षित असल्याचे सांगून कोथरूड आगारातून घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार तिकोणे आगारात पोहोचल्यानंतर त्यांचे पाकीट, त्यातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम त्यांना जसेच्या तसे परत करण्यात आली.यावेळी कोथरूड आगारातील गणेश सावळाराम बारवकर, वाहक विशाल भोसले आणि चालक गणेश बन्सीधर कदम उपस्थित होते.
पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांप्रती असलेली संवेदनशीलता ही निश्चितच कौतुकास्पद आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या अशा सकारात्मक कृतींमुळे पीएमपीएमएलवरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होत असून, ही घटना इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.
