काशिनाथ नखाते यांचा प्रशासनाला इशारा; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन
पुणे-पिंपरी-चिंचवडमधील बाईक टॅक्सी सेवांविरोधात रिक्षा-टॅक्सी चालक आक्रमक
पिंपरी, दि. २८ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विना परवाना सुरू असलेल्या बाईक टॅक्सी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करावीत, तसेच संबंधित ॲप बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाने केली आहे. येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास परिवहन कार्यालये आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.
चिंचवड येथील थरमॅक्स चौकात कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाच्या वतीने आयोजित रिक्षाचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी निमंत्रक नाना कसबे, संघटक विशाल सरवदे, सचिन मुरगुंड, बाबासाहेब सरवदे, राजू होनमाने, दादा खांडेकर, राजू बोराडे, किशोर टोणपे, मनोज घोडके आदी उपस्थित होते.
परवान्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तनिवेदनात रॅपीडो कंपनीकडे वैध बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा महासंघाने केला आहे. असे असतानाही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रॅपीडो, उबेर आणि ओला यांसारख्या कंपन्यांच्या बाईक टॅक्सी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
या बाईक टॅक्सी सेवांमुळे कायद्याचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गदा येत असल्याचे नखाते यांनी सांगितले. तसेच विना परवाना वाहतूक, विम्याचा अभाव आणि नियमांचे उल्लंघन यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
विना परवाना तसेच विमा आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या बाईक टॅक्सी वाहनांवर सायबर गुन्हे आणि फौजदारी कायद्यांतर्गत कारवाई करावी, कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि वाहने जप्त करावीत, अशी मागणी महासंघाने केली आहे.
“कायद्याचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर गदा येत असताना प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. बेकायदा बाईक टॅक्सी सेवा तातडीने बंद करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आठ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल,”
…… काशिनाथ नखाते. कामगार नेते
