लवळे, म्हाळुंगे आणि भुगावमधील मंडळांवर गुन्हे दाखल; वाहतूक ठप्प करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड, दि. ७ सप्टेंबर : दहीहंडी उत्सवादरम्यान विनापरवाना ध्वनीक्षेपक व DJ यंत्रणा मोठ्या आवाजात वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी लवळे, म्हाळुंगे आणि भुगाव येथील तीन दहीहंडी मंडळांवर कायदेशीर कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे उत्सवाच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडी उत्सवानिमित्त रात्रीच्या वेळी लवळे, म्हाळुंगे आणि भुगाव परिसरात मोठ्या आवाजात DJ व ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजविण्यात आली. संबंधित मंडळांकडे आवश्यक परवानगी नसतानाही ध्वनीक्षेपकांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. ध्वनीची निर्धारित मर्यादा ओलांडण्याबरोबरच पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करून सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होऊन सार्वजनिक उपद्रव निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अखिल लवळे गाव दहीहंडी उत्सव मंडळ, लवळे; सूर्युमुखी गणेश मंडळ, म्हाळुंगे; तसेच बाल मित्र मंडळ, माताळवाडी फाटा, भुगाव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०, २९३, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांसह कलम ३३(१)(आर)(III), ३७, ३८, १३५ आणि १३६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे तसेच पोलिसांच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. यापुढे बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना ध्वनीक्षेपक, साउंड सिस्टिम किंवा DJ यंत्रणेचा वापर करून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सुरासे, पोलीस हवालदार भैरट व पोलीस हवालदार हांगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
