निसरून शेख यांना जीवे मारण्याचा प्रयत्न; डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने मारहाण केल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड : चऱ्होली परिसरातील अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयासमोरील टेकडीवर पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका कामगाराला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान चिखली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयासमोरील टेकडीवर ही घटना घडली. फिर्यादीच्या गावातील कामगार निसरून शेख (वय ३२) आणि आरोपी सुभान उर्फ अली मोहम्मद (वय २२) हे फिरण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून निसरून शेख यांनी आरोपीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने मारहाण केली. तसेच, त्यांची मान आवळल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात निसरून शेख गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ११८(१) आणि ११८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभान उर्फ अली मोहम्मद याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.