पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय कारवाई; १५० हून अधिक बँक खात्यांचा वापर
दुबईतील चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी; एक कोटींहून अधिक रुपयांची कमाई केल्याची प्राथमिक माहिती
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : ऑनलाइन फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. सुमंत उर्फ नानु रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दुबईतून भारतातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या चिनी सायबर गुन्हेगारांसोबत तो भागीदारीत काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात यापूर्वी तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या माध्यमातून आरोपीने १५० पेक्षा अधिक बँक खाती मिळवून त्यांचा वापर सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कमिशनच्या आमिषातून सायबर गुन्ह्यांत सहभाग
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात तुषार चौधरी आणि आदर्श वाघमारे हे विविध बँकांमध्ये खाती उघडून त्यांची माहिती दुबईत असलेल्या सुमंत दसरे याला देत असल्याचे उघड झाले. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा केली जात होती.त्यानंतर दोघेही चेकद्वारे पैसे काढून त्यातील कमिशन स्वतःकडे ठेवत आणि उर्वरित रक्कम सीडीएमद्वारे दसरे याने दिलेल्या खात्यांमध्ये जमा करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमंत दसरे हा सुरुवातीला दुबईत दरमहा सहा हजार दिराम पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत होता. या कामात पीडितांकडून मिळणाऱ्या रकमेच्या चार टक्के कमिशनवर तो काम करत होता. पुढे चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी करून त्याने सायबर फसवणुकीचे रॅकेट सुरू केले. यातून फसवणुकीच्या रकमेतील २० टक्के हिस्सा त्याला मिळत असल्याची माहिती आहे.
एक कोटींहून अधिक कमाईचा प्राथमिक अंदाज
आरोपीने चिनी सायबर गुन्हेगारांकडून आंतरराष्ट्रीय कार्ड मिळवून विविध मॉल आणि ठिकाणी त्यांचा वापर करून महागड्या वस्तू खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. या वस्तू संबंधित गुन्हेगारांना देऊन तो कमिशन मिळवत होता.
आरोपीने आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कमावल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबाद, तेलंगणा तसेच पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
इंटरपोलच्या मदतीने दुबईतून आणले भारतात
आरोपी दुबईतून सायबर गुन्ह्यांचे रॅकेट चालवत असल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
वरिष्ठांच्या परवानगीने आरोपीविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आले. इंटरपोलच्या मदतीने दुबईत त्याला ताब्यात घेऊन भारतात डिपोर्ट करण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावरून प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.
दुबईतील कॉल सेंटरचा तपास सुरू
आरोपीला ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुबईतील सायबर गुन्हेगारांचे जाळे, तेथील सुरू असलेले कॉल सेंटर आणि या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ऑनलाइन गुन्ह्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांसंदर्भात आतापर्यंत ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंतरराष्ट्रीय कारवाईमुळे सायबर फसवणुकीच्या रॅकेटमधील आणखी महत्त्वाचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या पथकाने केली.
