गळा दाबून लोखंडी कड्याने चेहऱ्यावर ठोसा मारल्याचा आरोप; पोलिसाला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित १) वेभव सुभाष साळुंके वय ३२ वर्षे रा. आदर्श नगर गणेश दुध डेअरीचे पाठीमागे, पिंपळे गुरव, सांगवी पुणे २) कुशाल नयना गोयल वय २८ वर्षे रा. पवनानगर गल्ली नंबर ३, पिंपळे गुरव पुणे,३) सोहेल शब्बीर मुलानी वय २७ वर्षे रा. मोरया पार्क लेन नं.२, पिंपळे गुरव पुणे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल सुरेश शिंदे हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असून, ते वायसीएम रुग्णालयात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास आरोपी आपल्या मित्राला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी उपचार करत असताना आरोपींनी आरडाओरडा करून गोंधळ घातला. डॉक्टरांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला.
पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना गोंधळ न घालण्यास सांगितले असता, त्यांनी शिंदे यांच्याशी धक्काबुक्की करून त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर शिंदे हे अधिक पोलिस मदतीसाठी वायसीएम पोलीस चौकीत गेले असता, आरोपींपैकी एकाने पाठलाग करून चौकीत प्रवेश केला. त्याने शिंदे यांचा गळा पकडून दाबला आणि हातातील जाड लोखंडी कड्याने त्यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, इतर दोन आरोपींनीही शिवीगाळ करून बाहेर भेटल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), १२१(१), १२१(२), १३२, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ५६३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आटवे करीत आहेत.
