पुरंदर (वाल्हे) प्रतिनिधी….श्री. संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त समस्त ग्रामस्थ कामठवाडी यांच्या वतीने तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते विधिवत वीणा पूजन करून करण्यात आला.
संत सावता माळी यांच्या भक्तिमय आणि समतावादी विचारांचा प्रसार व्हावा, ग्रामस्थांमध्ये अध्यात्मिक संस्कार रुजावेत तसेच गावातील एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या प्रारंभामुळे कामठवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नामस्मरण, भजन, कीर्तन, पारायण आणि हरिपाठाच्या माध्यमातून संत सावता माळी यांच्या विचारांचा जागर करण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यास ह.भ.प. शरद महाराज दुर्गाडे, संदीप महाराज, शुभम महाराज, संतोष महाराज, भगवान दुर्गाडे, राजेंद्र दुर्गाडे, दगडू बुणगे, रामदास नवले, नामदेव दुर्गाडे, नितीन बुणगे, राजेंद्र नवले, सौ. नंदाताई प्रवीण दुर्गाडे यांच्यासह महिलावर्ग आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
संत सावता माळी यांच्या विचारांचा जागर करत भक्ती, समता आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा हरिनाम सप्ताह ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय वातावरणात सुरू झाला.
