पुणे (ग्रा.)जुन्नर : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली. एका १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी आळेफाटा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांचा संशय एका २५ वर्षीय तरुणावर गेला. विशेष म्हणजे, मुलीचा शोध सुरू असताना हा तरुण ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सहभागी झाला होता.
मात्र, तपासाची दिशा पुढे जात असताना पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संशयित तरुण हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला घरातून शेताच्या दिशेने नेले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची शक्यता तपासली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि संशयिताच्या जबाबाच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण असून, दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.