उपमहापौर शर्मिला बाबर; क्रांतिदिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे थोर क्रांतिकारकांना अभिवादन
पिंपरी, दि. ९ ऑगस्ट २०२६ : देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अमूल्य पर्व आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांमुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हा गौरवशाली वारसा भावी पिढ्यांनी जपावा. हुतात्म्यांच्या बलिदानातून देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घेऊन तरुणांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी भारतमातेचा जयजयकार करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर बोलत होत्या.
क्रांतिदिनानिमित्त चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास, तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य राजू बनसोडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माई काटे, प्रतीक्षा जवळकर, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन घोलप, प्रसाद केसरे, स्वप्निल वाघमारे, युवराज दाखले, मयूर घोलप, विशाल वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, सुभाष सिंगल, धर्मेंद्र क्षीरसागर, आबा कोळेकर, संजय बाईत, अनिता वाळुंजकर आदी उपस्थित होते.
चापेकर बंधूंच्या शौर्याला अभिवादन
चिंचवड गावातील थोर क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांनी बाळकृष्ण व वासुदेव या बंधूंसह पुण्यातील गणेशखिंडीत जुलमी इंग्रज अधिकारी रॅण्ड याचा वध केला. या घटनेने स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीची मशाल अधिक प्रज्वलित झाली. या कृत्याबद्दल इंग्रजांनी चापेकर बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या स्मरणार्थ चिंचवड येथील हुतात्मा चापेकर चौकात चापेकर बंधू तसेच त्यांचे सहकारी महादेव रानडे यांचे भव्य समूह स्मारक उभारण्यात आले आहे.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंच्या कार्याचे स्मरण
चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे पुतळे आहेत. लहुजी साळवे हे दांडपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि निशाणेबाजी यांसारख्या युद्धकलेत निपुण होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांच्यासह अनेक क्रांतिकारकांच्या फौजा तयार करण्याचे कार्य केले.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांच्या बलिदानाचे स्मरण
दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. **‘इन्कलाब जिंदाबाद’**चा नारा देत शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या बलिदानामुळे देशातील असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली. हुतात्मा नारायण दाभाडे यांनीही अल्पवयातच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पिंपरी-चिंचवड शहराचे स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले. शहरातील तसेच देशातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि वीर जवानांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
