भोसरी प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावरील गाळा क्रमांक ११२ ‘ब’ येथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर भोसरी पोलिसांनी छापा टाकून सात जणांवर कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजता ही कारवाई करण्यात आली. बालाजी शिवाजी संगमे (वय ४६), अशोक आनंदा बनसोडे (४३), प्रकाश अभिमन्यू लोंढे (३८), किशोर पुनित शाहु (४९), देवातेजो पंडीत (३४), बिरेंदर गौरीशंकर साहु (४७) आणि योगेश दिनकर नागरगोजे (३६) हे तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले.
सदर ठिकाणी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच क्लब चालकाने आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ ते ७ यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
या कारवाईत ५९ हजार ३०० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलीस हवालदार मयूर ज्ञानेश्वर गारूडकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.