‘डिजिटल जीवनामागील अदृश्य पायाभूत सुविधा’वर सचिन गोपाळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे/बेल्हे, प्रतिनिधी …. : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘आपल्या डिजिटल जीवनाला आधार देणारी अदृश्य पायाभूत व्यवस्था’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अदानीकॉननेक्स कंपनीचे हेड–इलेक्ट्रिकल (प्रोजेक्ट्स–पॅन इंडिया) सचिन गोपाळे प्रमुख पाहुणे व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख स्नेहा शेगर, ई अँड टीसी विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागप्रमुख प्रा. निवृत्ती चौधरी, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. रवींद्र नवले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. अमोल खतोडे, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. निलेश नागरे, एमसीए विभागप्रमुख प्रा. प्रमोद गोपाळे, प्रा. शुभम शेळके यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे सचिन गोपाळे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिन गोपाळे यांनी डिजिटल युगातील दळणवळण व्यवस्था, डेटा सेंटर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, डिजिटल सेवांमागील पायाभूत सुविधा तसेच आधुनिक जीवनात अभियंत्यांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण दररोज वापरत असलेल्या डिजिटल सुविधांच्या पाठीमागे कार्यरत असलेल्या अदृश्य पायाभूत व्यवस्थेचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या संधी, तांत्रिक प्रगती, बदलते औद्योगिक क्षेत्र आणि भविष्यातील आव्हाने याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान, नवकल्पना आणि अभियांत्रिकी क्षेत्राविषयी उत्सुकता निर्माण होऊन त्यांना नवी प्रेरणा मिळाली.
अभियंता दिनानिमित्त महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विविध विभागांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सुचिता साबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
