२०१७ आणि २०२६ मध्ये उमेदवारीसह स्वीकृत नगरसेवकपदाचीही संधी हुकल्याचा आरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे न्यायाची मागणी
पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करूनही राजकीय संधीच्या वेळी मात्र आपल्याला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची खंत भाजप कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर यांनी व्यक्त केली आहे. २०१७ आणि २०२६ या दोन्ही निवडणूक प्रक्रियांमध्ये उमेदवारीची संधी नाकारण्यात आली, तर स्वीकृत नगरसेवकपदापासूनही वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षासाठी निष्ठेने काम करणे हाच आपला गुन्हा आहे का, असा थेट सवाल त्यांनी पक्ष नेतृत्वाला केला आहे.
या कथित अन्यायाबाबत काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली असून, आपल्या राजकीय योगदानाची दखल घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला, हीच चूक ठरली का?
सचिन काळभोर यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना २०१४ मधील भोसरी विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला आहे. या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रचार केला होता. मात्र, त्यानंतर स्थानिक राजकीय समीकरणांमुळे आपल्याला पक्षात काम करण्यापासून रोखण्यात आले आणि राजकीय संधींपासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
२०१४ मध्ये आमदार महेश लांडगे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. त्यावेळी भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे महेश लांडगे यांची आपल्यावर नाराजी असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे. २०१६-१७ मध्ये लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ही नाराजी कायम राहिल्याचा त्यांचा आरोप आहे.
दहा प्रभागांतील नागरी प्रश्नांसाठी संघर्ष
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दहा प्रभागांमध्ये नागरिकांच्या नागरी समस्यांसाठी सातत्याने काम केले. आंदोलने, मोर्चे आणि विविध माध्यमांतून नागरिकांचे प्रश्न मांडले. या संघर्षादरम्यान आपल्याविरोधात काही पोलीस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, हे सर्व नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना घडल्याचे काळभोर यांचे म्हणणे आहे.
पक्ष संघटनेसाठी योगदान देऊनही निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही आणि स्वीकृत नगरसेवकपदासाठीही विचार झाला नाही. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन नेमके कोणत्या निकषांवर केले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पक्षश्रेष्ठींनी अन्यायाचे कारण स्पष्ट करावे!
“मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पक्षासाठी आणि जनतेसाठी काम करताना अनेक अडचणींचा सामना केला. तरीही प्रत्येक वेळी मला डावलले जाते. माझी नेमकी चूक काय? पक्षासाठी निष्ठेने काम करणे हाच माझा गुन्हा आहे का?” असा संतप्त सवाल सचिन काळभोर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
आता पक्षश्रेष्ठी सचिन काळभोर यांच्या तक्रारीची दखल घेऊन काय भूमिका घेतात, याकडे पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
