उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा महापालिका प्रशासनाला स्पष्ट संदेश; कचरा व्यवस्थापनापासून नदी पुनरुज्जीवनापर्यंत विकासकामांचा घेतला आढावा
पिंपरी-चिंचवड : शहराच्या विकासासाठी अजितदादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. पिंपरी-चिंचवडला सुंदर, नियोजनबद्ध आणि देशातील अग्रगण्य शहर बनविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. शहरातील सुरू असलेली विकासकामे दर्जेदार असावीत, ती निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरातील विविध विकासकामांचा, पायाभूत सुविधांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे डॉ. राजेश देशमुख, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
अजितदादांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा कधीही विसरता येणार नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आणि आधुनिक सुविधांनी युक्त नियोजनबद्ध शहर उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. शहराचा विकास करताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. आज देशात पिंपरी-चिंचवडचा उल्लेख झाला की अजितदादांच्या योगदानाची आठवण होते. त्यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे भावनिक आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
मोशीतील कचरा दुर्घटनेची पुनरावृत्ती नको!
मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. दुर्घटनेनंतर संबंधित ठिकाणी कचरा नेणे बंद करण्यात आले आहे. मात्र, शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला जाईल. प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दुष्काळामुळे शहरावर वाढणारा लोकसंख्येचा भार ओळखा!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे विविध भागांतील नागरिक रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या अचानक वाढल्यास पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि अन्य मूलभूत सुविधांवर ताण निर्माण होऊ शकतो. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. पवना आणि इंद्रायणी नदीपात्रातील अतिक्रमणे रोखून नदी पुनरुज्जीवनाच्या कामांनाही गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करा!
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योगपूरक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. औद्योगिक परिसरातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याबाबत प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून ते मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या विकास वारसाला न्याय देण्याची जबाबदारी सर्वांची!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा एकदा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. केवळ विकासकामे हाती घेऊन चालणार नाही, तर ती गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. अजितदादांनी शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करेल. शहराच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी राज्य शासन महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
अजितदादांच्या विकासदृष्टीचा वारसा, शहराच्या भविष्यातील आव्हानांचे नियोजन आणि रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार, या मुद्द्यांमुळे सुनेत्रा पवार यांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
