पिंपरी-चिंचवड : भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचा जागर आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भव्य ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दौडीला सकाळी ७ वाजता चिंचवड येथील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौकातून सुरुवात होणार आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतराची ही दौड पिंपरीतील भीमसृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाप्त होणार आहे.
या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून दौडीचा समारोप करण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक नागरिकाला विशेष सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
लोकशाही मूल्यांचा जागर
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही संविधानाची मूलभूत मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या दौडीत लोकप्रतिनिधी, अधिकारी, पोलीस प्रशासन, उद्योजक, डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि विविध क्रीडा संघटना सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे, संविधान दिनानिमित्त दरवर्षी अशा प्रकारची दौड आयोजित करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.
शंकर जगताप यांचे नागरिकांना आवाहन
आमदार शंकर जगताप म्हणाले, भारतीय संविधानाने देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ही दौड केवळ क्रीडा उपक्रम न राहता संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची लोकचळवळ व्हावी. त्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
दौडीचा तपशील….
🔴दिनांक: गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६
🔴वेळ: सकाळी ७ वाजता
🔴प्रारंभ: क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौक, चिंचवड
🔴समारोप: भीमसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी
🔴अंतर: सुमारे दीड किलोमीटर
नागरिकांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून या ऐतिहासिक दौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
