वाहक संदीप गुंजकर आणि चालक दिलीप टेकवडे यांची समयसूचकता; बाणेर आगारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही केली तत्पर मदत
पुणे प्रतिनिधी : प्रवाशांची सुरक्षितता आणि सेवा हेच आपले कर्तव्य मानत पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे. बसमधून प्रवास करत असताना अचानक चक्कर येऊन अस्वस्थ झालेल्या महिला प्रवाशाला वाहक आणि चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कर्मचाऱ्यांच्या या समयसूचकतेमुळे महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मार्ग क्रमांक ११४/१३ (मनपा ते म्हाळुंगे) या बसमधून सौ. करिष्मा अविराज राजपूत या मनपा ते कळमकरवस्ती असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांना अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागले. ही बाब बसचे वाहक संदीप गुंजकर (वाहक क्रमांक ६३९२) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालक दिलीप टेकवडे (चालक क्रमांक BT 720) यांना बस जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.
त्यानुसार चालक टेकवडे यांनी तातडीने बस बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेली. यावेळी बाणेर आगाराचे असिस्टंट डेपो मॅनेजर श्रीहरी ढाकणे, क्लर्क निलेश पवार, टाइमकीपर मदतनीस दत्तात्रय बोरकर आणि कायम चालक रशीद मुलाणी यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्वांनी मिळून महिला प्रवाशाला रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, असिस्टंट डेपो मॅनेजर श्रीहरी ढाकणे यांनी महिला प्रवाशांच्या नातेवाइकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली. तसेच त्यांना तातडीने मणिपाल हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचे कळविले.
कर्तव्यापलीकडे जाऊन दाखविलेली माणुसकी!
प्रवाशाला अचानक वैद्यकीय मदतीची गरज निर्माण झाल्यानंतर स्वतःची जबाबदारी ओळखून वाहक, चालक आणि आगारातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे एका महिला प्रवाशाला वेळीच उपचार मिळण्यास मदत झाली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाहक संदीप गुंजकर, चालक दिलीप टेकवडे, असिस्टंट डेपो मॅनेजर श्रीहरी ढाकणे, क्लर्क निलेश पवार, टाइमकीपर मदतनीस दत्तात्रय बोरकर आणि कायम चालक रशीद मुलाणी यांचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले.
प्रामाणिकपणा हीच खरी ओळख, प्रवासी सेवा हेच आमचे कर्तव्य! हा संदेश पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केला आहे.
