पुणे प्रतिनिधी : शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. शहरातील सार्वजनिक जागा, पदपथ आणि रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध भागांत निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे.
दि. १९ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत धनकवडी, औंध, घोले रोड, कोंढवा-उंड्री, बिबवेवाडी, नगर रोड, वानवडी आणि हडपसर या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध राहाव्यात, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे तसेच वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध भागांत दररोज अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही केली जात असून, सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
