रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा; १२ तासांच्या ड्युटीला विरोध, मनमानी बदल्या आणि अन्यायकारक चार्जशीट रद्द करण्याची मागणी
पुणे प्रतिनिधी: रेल्वे प्रशासनाच्या धोरणांमुळे स्टेशन मास्टर्स कर्मचाऱ्यांवर वाढत चाललेला कामाचा ताण, रिक्त पदांची समस्या, मनमानी बदल्या आणि अन्यायकारक कारवाई याविरोधात शुक्रवारी (२० नोव्हेंबर) पुण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (एआयएसएमए) पुणे मंडळाच्या वतीने पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
रिक्त पदांची तातडीने भरती करा, १२ तासांच्या ड्युटीऐवजी सहा तासांची ड्युटी लागू करा, अन्यायकारक चार्जशीट मागे घ्या आणि विनाकारण केल्या जाणाऱ्या बदल्या थांबवा, अशा विविध मागण्यांनी आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.
या आंदोलनात संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रे, पुणे मंडळाचे सचिव दिनेश कांबळे आणि अध्यक्ष पुरुषोत्तम सिंग यांच्यासह अनेक स्टेशन मास्टर्स सहभागी झाले होते.
पुणे रेल्वे मंडळात स्टेशन मास्टर्स आणि पॉइंट्समनची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. परिणामी, उपलब्ध कर्मचाऱ्यांनाच अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असून, अनेकांना १२ तासांपेक्षा अधिक काळ काम करावे लागत आहे. सततच्या अतिरिक्त कामामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मानसिक तणावातही वाढ होत असल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरून कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी करण्याची मागणी करण्यात आली.
किरकोळ चुकांसाठी चार्जशीटचा ससेमिरा!
रेल्वे गाड्यांना होणाऱ्या विलंबासाठी मूळ कारणांचा शोध न घेता स्टेशन मास्टर्सना जबाबदार धरणे, किरकोळ चुकांवर चार्जशीट बजावणे आणि एकतर्फी कारवाई करणे, या प्रकारांवर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील दोन ते तीन वर्षांतील चार्जशीटचा आढावा घेऊन अन्यायकारक कारवाया रद्द कराव्यात, तसेच कर्मचाऱ्यांना समुपदेशन व प्रशिक्षणाची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
बदली धोरणात पारदर्शकता आणण्याची मागणी
विनाकारण होणाऱ्या बदल्यांना आळा घालून एचआरएमएस प्रणालीद्वारे पारदर्शक आणि समान बदली धोरण राबवावे, विभागीय स्टेशन मास्टर परीक्षेची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, संवेदनशील रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त स्टेशन मास्टर नियुक्त करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.
महिला स्टेशन मास्टर्ससाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष आणि स्वच्छतागृहांची सुविधा, नगर-बीड विभागासह सिरसाई स्थानकाचा रोस्टर लागू करणे, यांसारखे प्रश्नही आंदोलनातून मांडण्यात आले.
या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी कृष्ण मुरारी, शकील इनामदार, सुधीर गरुड, विजय पाटील, सूर्यकमल यादव, अर्जुन कुमार, राज सोनवणे, अनिल तिवारी आणि गंगाधर साहू यांनी परिश्रम घेतले.
