फ्रंट मार्जिन, पार्किंग आणि इमारतींच्या मोकळ्या जागांतील अनधिकृत व्यवसायांवर हातोडा; दोन महिने सलग धडक मोहीम, राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे-फोटो जाहीर करण्याचा आयुक्तांचा इशारा!
पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील अतिक्रमणांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता आरपारची लढाई सुरू केली आहे. रस्त्यांवरील पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून अतिक्रमणांचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आता थेट बड्या व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा वळविला आहे. इमारतींचे फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन, पार्किंगच्या जागा तसेच मोकळ्या भूखंडांवर थाटलेल्या अनधिकृत व्यवसायांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन महिने शहरात अतिक्रमणविरोधी धडक मोहीम राबविण्यात येणार असून, राजकीय दबाव आणणाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करण्याचा सज्जड इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
अडीच ते तीन लाख अनधिकृत व्यवसायांचा विळखा!
पुणे शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमध्ये इमारतींच्या फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि पार्किंगच्या जागांवर अनधिकृत व्यवसायांनी बस्तान बसविले आहे. महापालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार, अशा प्रकारे अडीच ते तीन लाख अनधिकृत व्यावसायिकांनी जागा व्यापल्या आहेत. विशेष म्हणजे, शहरात अधिकृत परवानाधारक पथारी व्यावसायिकांची संख्या अवघी २२ हजार असताना अनधिकृत व्यवसायांचा आकडा लाखोंमध्ये पोहोचल्याने महापालिकेच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फर्ग्युसन रोडवरील आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जागे!
फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न महापालिकेच्या मुख्य सभेत चांगलाच गाजला होता. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच प्रशासनाला धारेवर धरत अतिक्रमणांच्या नावाखाली हप्तेखोरी होत असल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः मैदानात उतरून अतिक्रमणविरोधी कारवाईला गती दिली. फर्ग्युसन रस्त्यानंतर जंगली महाराज रस्ता, कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरातही प्रशासनाने धडक कारवाई केली.
ओटे, रेलिंग, कॅनोपीसह अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त होणार!
आता महापालिकेने कारवाईची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत ओटे, रेलिंग, बॅरिकेड्स, कॅनोपी आणि अन्य बांधकामांवर थेट कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा आस्थापना सील करण्याबरोबरच फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. पुन्हा अतिक्रमण केल्यास बांधकाम विभागामार्फतही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जेसीबी, बुलडोझर आणि १०० एमएसएफ जवानांचा फौजफाटा!
या मोहिमेसाठी अतिरिक्त जेसीबी, बुलडोझर आणि आधुनिक यंत्रसामग्री तैनात करण्यात येणार आहे. तसेच १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती केली जाणार आहे. अतिक्रमणधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता नव्हे, तर नियमानुसार कारवाईची प्रक्रिया राबवून अतिक्रमणे हटविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील अतिक्रमणे हटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राजकीय दबाव आणाल तर नाव आणि फोटो जाहीर करणार!
अतिक्रमणविरोधी मोहिमेत कोणत्याही राजकीय व्यक्तीचा किंवा अन्य घटकाचा दबाव सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. चुकीच्या कामासाठी कोणी सूचना दिल्यास अधिकाऱ्यांनी त्या मान्य करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे सार्वजनिक करण्याची जबाबदारी क्षेत्रीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. अतिक्रमण करणारा गरीब असो वा श्रीमंत, नियम सर्वांसाठी समान असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणारच, असा ठाम संदेश प्रशासनाने दिला आहे.
वर्षानुवर्षांच्या अतिक्रमणांकडे आताच लक्ष कसे गेले?
पुणे शहरात अतिक्रमणांचा प्रश्न काही आजचा नाही. रस्ते, पदपथ, बाजारपेठा आणि इमारतींच्या मोकळ्या जागांवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे वाढत असताना प्रशासनाने आतापर्यंत नेमकी कोणती भूमिका घेतली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यापूर्वी कारवाई का झाली नाही, याचे उत्तर देणे कठीण असल्याची कबुली खुद्द आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. फ्रंट मार्जिनवरील अतिक्रमणे ही शहरातील सर्वांत मोठी समस्या असल्याचे आता लक्षात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूककोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिकेची ही मोहीम केवळ प्रसिद्धीपुरती न राहता प्रत्यक्षात शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन महिने बुलडोझर चालणार; पण त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याची जबाबदारी कोण घेणार? हा खरा प्रश्न पुणेकरांसमोर आहे.
