येरवड्यातील सराईत गुन्हेगार आकाश कंचिले टोळी पोलिसांच्या रडारवर; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मकोका कारवाईला मंजुरी, मुख्य आरोपी अद्याप फरार
पुणे प्रतिनिधी : कोंढवा परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या घटनेतील सराईत गुन्हेगार आकाश वसंत कंचिले याच्यासह त्याच्या सात साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. कोंढवा पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी दिल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मकोका कारवाई झालेल्यांमध्ये आकाश वसंत कंचिले (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दिनेश रामदास घाडगे (वय २५), कार्तिक महादेव पांडागळे (वय १९), विजय रामदास चौंधे (वय १८), जितेंद्र उर्फ दादू जालिंद भालेराव (वय २२), लक्ष्मण उर्फ सोनू शिवाजी गजरमल (वय २६), प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम (वय २६) आणि धम्मा शशिकांत साळवे (वय २०) यांचा समावेश आहे.
आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवादरम्यान आकाश कंचिले आणि त्याच्या साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप आहे. आकाश कंचिले हा या टोळीचा प्रमुख असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा, कोंढवा, लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून कंचिले फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून या टोळीविरुद्ध मकोक्याचा बडगा उगारण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी तसेच उपनिरीक्षक रवींद्र गावडे, शेखर कोळी, एकोर्गे, चव्हाण आणि माने यांनी सहभाग घेतला.