डेल्टा अल्गो अॅपद्वारे गुंतवणुकीचे आमिष; खात्यावर ९५ लाखांचा नफा दिसला, मात्र मुद्दलासह रक्कम काढता आली नाही
पिंपरी प्रतिनिधी : शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चऱ्होली येथील एका नोकरदाराची तब्बल ३१ लाख ६ हजार ९५० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रवीण उख्खा सोनवणे (वय ४३, व्यवसाय नोकरी) यांनी फिर्याद दिली आहे. ते चऱ्होली बुद्रुक येथील सप्तगड हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. ऑगस्ट २०२६ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवत असल्याच्या जाहिराती व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘डेल्टा अल्गो’ नावाचे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीने लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड केले. त्यानंतर त्यांचे डीएमए (डायरेक्ट मार्केट ॲक्सेस) खाते सुरू करून देण्यात आले.
आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर फिर्यादीने टप्प्याटप्प्याने एकूण ३१ लाख ६ हजार ९५० रुपये पाठवून गुंतवणूक केली. काही दिवसांनंतर ॲपवरील त्यांच्या खात्यात तब्बल ९५ लाख २ हजार ४०४ रुपये ५५ पैसे इतका नफा झाल्याचे दिसू लागले. त्यामुळे फिर्यादीने मुद्दल आणि नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर ॲपमधील पैसे काढण्याचा (विड्रॉल) पर्यायही बंद करण्यात आला.
याबाबत फिर्यादीने संबंधित महिलेकडे विचारणा केली असता, शेअर्स विकल्यास पैसे दुसरीकडे गुंतवले जातील आणि रक्कम काढता येणार नाही, अशी कारणे सांगण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
याप्रकरणी एका महिलेसह व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन आणि विविध बँक खात्यांच्या खातेदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नसल्याची नोंद आहे.
दिघी पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक मुसळे पुढील तपास करीत आहेत.