माईकच्या लोखंडी स्टँडच्या पाईपने फिर्यादीसह मध्यस्थी करणाऱ्यांनाही मारहाण; होंडा सिटी कारची काच फोडून नुकसान
भोसरी प्रतिनिधी : धार्मिक कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना भोसरीतील मोहननगर येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत एका महिलेच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून, एका कारचेही नुकसान करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मोहननगर, भोसरी येथे फिर्यादीच्या राहत्या घरासमोर धार्मिक कार्यक्रम सुरू होता. यावेळी फिर्यादीच्या ओळखीच्या गीता गायकवाड आणि त्यांचे पती शिवदास शंकर गायकवाड हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. ‘मी तुझी गुरू असतानाही तू मला कार्यक्रमाला का बोलावले नाही?’ असा जाब विचारत गीता गायकवाड यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
दरम्यान, शिवदास गायकवाड यांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या माईकच्या लोखंडी स्टँडचा पाइप हातात घेऊन फिर्यादीसह भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नागरिकांना मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच सोहम सोनवणे यांच्या होंडा सिटी कारची (एमएच १४ ईएच ३९५९) समोरील आणि उजव्या बाजूची काच फोडून नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील दौड करीत आहेत.