निमगाव खलूच्या विद्यार्थ्यांसमोर सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा भुजबळ यांचा प्रभावी नाट्यप्रयोग
निमगाव खलू, ता. श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर, दि.१६ सप्टेंबर २०२६ :…महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त निमगाव खलू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा राहुल भुजबळ यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हे प्रभावी एकपात्री नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगातून महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसमोर जिवंत करण्यात आला.
स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ, सामाजिक समता, अस्पृश्यता निर्मूलन, शैक्षणिक चळवळ आणि समाजपरिवर्तनासाठी फुले दाम्पत्याने केलेल्या संघर्षाचे विविध पैलू एकपात्री नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या वाट्याला आलेला संघर्ष, अपमान, त्याग आणि समाजपरिवर्तनाची तळमळ यांचे सशक्त सादरीकरण पाहून विद्यार्थी व ग्रामस्थ भारावून गेले.
नाट्यप्रयोगातून विद्यार्थ्यांना केवळ इतिहासाची माहिती न मिळता शिक्षण, समानता आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. फुले दाम्पत्याच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा परिचय कलात्मक माध्यमातून करून देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक रमेश दत्तू कुसळकर, आरती चौघुले, रवींद्र त्रिभुवन, वृषाली दगडे, नामदेव गवळी, मार्गदर्शक प्रा. पुंडलिकराव भामोदे (जि. अकोला), जनार्धन गणपत भागवत (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर), सामाजिक कार्यकर्त्या ताई मोहन खेडेकर आणि शकुंतला जनार्धन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुले दाम्पत्याच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, नाट्यरूपातून इतिहास आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
