प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर यांची मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे मागणी
अहिल्यानगर | प्रतिनिधी…..जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. पावसाअभावी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस आणि कांदा यांसारखी प्रमुख पिके करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, जनावरांनाही चारा आणि पाण्याअभावी उपासमारीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीप्रेमी तथा पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. या निवेदनात त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत.
*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी.
*पात्र शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी.
*शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी किंवा कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.
*जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी.
यावेळी प्रा. बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या वेदना मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची आजची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. शेतकरी संकटात असताना शासनाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल!”
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मदतकार्य सुरू करावे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देऊन त्यांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण निर्माण करावा, अशी कळकळीची मागणी प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांनी केली आहे.
