अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील न्यू हायस्कूलच्या प्रांगणात दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, गायक, गीतकार, व्याख्याते व शाहीर विजय मोकळे करंजगावकर यांना त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध शाहीर नंदकुमार खरात तसेच स्वरनाथ संगीत विद्यालयाच्या संचालिका आरती खरात यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजनातून केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक कवी, गायक, शाहीर व कलाकारांना या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी आलेल्या कलाकारांचे सन्मानपूर्वक स्वागत करून त्यांना बॅच लावण्यात आला. त्यानंतर कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व गायक सुनीलदादा खरे, झी टॉकीज व ‘होम मिनिस्टर’ फेम प्रसिद्ध भारुडकार संदीपजी जाधव, बैरागी सर, शाहीर भीमराव कदम, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका रेखा भारती, ‘इंडियन आयडॉल’ फेम आम्रपाली पगारे यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कवी, गायक व कलाकार उपस्थित होते. न्यू हायस्कूलचे विद्यार्थी तसेच शिक्षकवृंदही यावेळी उपस्थित होते.
‘पाठी भीमराव तो सावलीसारखा’ गीताला रसिकांची उत्स्फूर्त दाद…
या प्रसंगी विजय मोकळे करंजगावकर यांनी स्वतः लिहिलेले ‘आम्हा शिकवायचा माऊलीसारखा, पाठी भीमराव तो सावलीसारखा’ हे भीमगीत ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ या चालीवर आपल्या सुरेल आवाजात सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कौतुक केले.
अण्णासाहेब कटारे व रेखा भारती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान…
कार्यक्रमातील पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते अण्णासाहेब कटारे शेजवळ साहेब तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका रेखा भारती यांच्या शुभहस्ते सुप्रसिद्ध कवी, गायक, गीतकार, कविगायक विजय मोकळे करंजगावकर यांना ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ची ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब कटारे शेजवळ साहेब यांनी विजय मोकळे करंजगावकर यांच्या गीत-सादरीकरणाचे कौतुक करून त्यांच्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली.
१९९३ पासून प्रबोधनाची अखंड वाटचाल….
विजय मोकळे करंजगावकर यांनी सन १९९३ पासून महाराष्ट्रभर शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व सामाजिक प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले आहे. आजवर त्यांनी ४०० हून अधिक प्रबोधनपर कार्यक्रम केले असून, ‘मायबाप’ या विषयावर दीडशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. गीत, गायन, कविता, शाहिरी आणि व्याख्यानांच्या माध्यमातून ते सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
त्यांच्या साहित्यिक कार्याचीही दखल घेण्यात आली असून त्यांच्या चार कवितासंग्रहांना शासनाची मान्यता मिळाली आहे, तसेच त्यांची १४ गाणी रेकॉर्ड झाली आहेत.
पुरस्काराबद्दल विजय मोकळे करंजगावकर यांनी शाहीर नंदकुमार खरात व त्यांच्या कन्या आरती खरात यांचे विशेष आभार मानले. अनेक कार्यक्रमांना विविध कारणांमुळे उपस्थित राहता आले नसले तरी त्यांनी आवर्जून निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, कलाकार, कार्यकर्ते, नेते आणि महाराष्ट्रातील तमाम रसिक मायबापांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले.
दरम्यान, त्यांनी सादर केलेले ‘आम्हा शिकवायचा माऊलीसारखा, पाठी भीमराव तो सावलीसारखा’ हे भीमगीत त्यांच्या ‘Vijay Mokale Karanjgaonkar Official’ या YouTube चॅनेलवर उपलब्ध असून रसिकांनी हे गीत ऐकून चॅनेलला सबस्क्राईब व गीताला लाईक करून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा सोहळा काव्य, गायन, शाहिरी, भारुड आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध कलाविष्कारांनी उत्साहात पार पडला.
