सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांची सहाय्यक आयुक्तांकडे मागणी
अहिल्यानगर : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा दुसरा हप्ता तांत्रिक कारणांमुळे बँकेकडून रिजेक्ट झालेल्या व अद्याप प्रलंबित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ चेकद्वारे अदा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्वाधार शिष्यवृत्तीच्या अनेक पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांना आधार सीडिंग व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण असूनदेखील तांत्रिक कारणांमुळे शिष्यवृत्तीचे पेमेंट बँकेकडून रिजेक्ट झाले आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा दुसरा हप्ता प्रलंबित आहे.
तांत्रिक कारणांमुळे ऑटो पेमेंट होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित रकमेबाबत संबंधित विद्यार्थ्यांची यादी चेकद्वारे पेमेंट करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रलंबित पेमेंटचे चेक तात्काळ काढून रक्कम अदा करावी, अशी मागणी मोकळे यांनी केली आहे.
सध्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्जही सादर करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत मागील वर्षाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पेमेंट प्रलंबित राहणे ही गंभीर बाब असल्याचे मोकळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“रखडलेले स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे पेमेंट चेकद्वारे त्वरित वितरित करण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक आदेश द्यावेत आणि विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा,”
….. विजय मोकळे करंजगावकर, सामाजिक कार्यकर्ते