‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या उभारणीचे अण्णांकडून विशेष कौतुक
वस्ताद किसनराव लांडगे व हजारे कुटुंबीयांच्या जुन्या स्नेहाला उजाळा
अहिल्यानगर, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार लांडगे यांनी अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.
आमदार महेश लांडगे यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. वस्ताद किसनराव लांडगे हे अण्णांची भेट घेण्यासाठी अनेकदा राळेगणसिद्धी येथे जात असत. त्यामुळे लांडगे व हजारे कुटुंबीयांमध्ये आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना, सुरू असलेली कार्यवाही तसेच भावी पिढ्यांसाठी या स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांनी अण्णा हजारे यांना माहिती दिली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या भव्य स्मारकाच्या उभारणीचे अण्णा हजारे यांनी विशेष कौतुक केले. सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सल्लाही त्यांनी आमदार लांडगे यांना दिला.
अण्णा हजारे यांनी ग्रामविकास, व्यसनमुक्ती, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या भेटीतून मिळालेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद लोकहिताच्या कार्यासाठी नवी ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
अण्णांचे मार्गदर्शन म्हणजे नवी ऊर्जा : आमदार महेशदादा लांडगे
“माझे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि आदरणीय अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे अण्णांसोबत आमचा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आहे. राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आशीर्वाद घेतले. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या उभारणीचे अण्णांनी केलेले कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे मार्गदर्शन लोकहितासाठी अधिक समर्पितपणे काम करण्याची नवी ऊर्जा देते.”
