मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी; पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा विराट मोर्चा
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, एसआयआर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) प्रक्रिया रद्द करावी आणि देशात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी केली.
निवडणूक प्रक्रियेतील कथित बदलांविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने गुरुवारी (दि. ८) पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिक, मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चादरम्यान तहसील कार्यालय परिसर ‘ज्ञानेश कुमार हटाव’, ‘एसआयआर बंद करा’, ‘मतपत्रिकेवर निवडणुका घ्या’ अशा घोषणांनी दणाणून गेला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह?
यावेळी चेतन पवार म्हणाले, “निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि निवड यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला. या बदलामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा नियुक्ती प्रक्रियेतील सहभाग दूर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.”
ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीच्या कायदेशीरतेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित करण्यात आले असल्याचा दावा करत, त्यांच्या नियुक्तीबाबतही शंका निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले. निवडणूक आयोगाची स्वायत्तता अबाधित राहणे आवश्यक असून, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘एसआयआरमुळे मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होण्याची शक्यता’
एसआयआर प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांवरही पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. या प्रक्रियेमुळे अधिकारांचे केंद्रीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआरविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्याचा दावा करत, या प्रक्रियेमुळे मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ती तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकशाही प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. निवडणूक आयोगाची स्वायत्तता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ, असा निर्धार चेतन पवार यांनी व्यक्त केला.
‘कायदेशीर कारवाई करावी’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्या नियुक्तीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची कायदेशीर पातळीवर चौकशी करावी, तसेच एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
