‘डेक्कन कॉन्करर्स – राऊंड २’ स्पर्धेत लेडीज क्लासमध्ये पटकावले विजेतेपद
पुणे : डर्ट ट्रॅक रेसिंगसारख्या साहसी आणि आव्हानात्मक क्रीडा प्रकारात आपल्या कौशल्याची छाप उमटवत पुण्याची युवा महिला रायडर सारंगी करंजावणे हिने दिमाखदार यश संपादन केले आहे. रोड राईझ क्लबच्या वतीने १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील AISSMS मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘डेक्कन कॉन्करर्स – राऊंड २’ या भव्य डर्ट ट्रॅक रेसिंग स्पर्धेत सारंगीने लेडीज क्लासमध्ये प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानात्मक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत सारंगीने आपल्या उत्कृष्ट रायडिंग कौशल्याचे, वेगावरील नियंत्रणाचे आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन केले. वेग, अचूकता, संतुलन आणि जिद्द यांचा सुरेख मेळ साधत तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या दमदार कामगिरीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
मोटरस्पोर्ट्ससारख्या साहसी क्षेत्रात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने आपली क्षमता सिद्ध करू शकतात, हे सारंगीने आपल्या विजयातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तिच्या या यशामुळे तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, रेसिंग कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
विशेष म्हणजे, सारंगीला रायडिंगचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. तिचे वडील स्वतः उत्कृष्ट रायडर असून, त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन सारंगीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण ठरले आहे. तिची आई एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असून, त्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणूनही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
कुटुंबाचे प्रोत्साहन, स्वतःची मेहनत, जिद्द आणि साहसी वृत्ती यांच्या जोरावर सारंगीने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील रेसिंग वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
