घराघरांत उजळणार स्वच्छतेचा दीप!
१७ सप्टेंबरला घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करण्याचे आवाहन; ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा
पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छ, निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांसह शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वच्छता ही केवळ रस्ते, चौक अथवा सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक घरातून आणि प्रत्येक कुटुंबातून सुरू झाली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा. स्वच्छतेचा हा दीप कुटुंबाच्या आरोग्याबरोबरच स्वच्छ आणि सुंदर शहराच्या संकल्पाचे प्रतीक ठरावा, अशी महापालिकेची भूमिका आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ शहराची सुरुवात आपल्या घरापासून होते. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शहराच्या स्वच्छतेवर होतो. त्यामुळे नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छतेचा संकल्प करावा.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून सातत्याने अंगीकारायची जीवनशैली आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ, निरोगी आणि सुंदर शहराच्या निर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा.”
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. नियमित स्वच्छतेच्या सवयींमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी अंगीकारावी, असे त्यांनी आवाहन केले.
उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, “नागरिकांचा सहभाग हा स्वच्छता अभियानाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक घरातून स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनी घराची स्वच्छता करावी, दिवा प्रज्वलित करून स्वच्छ आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा. तसेच आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करून अभियानाला व्यापक लोकसहभाग मिळवून द्यावा.”
ऑनलाइन सहभागाची नोंद कशी कराल?
उपक्रमात सहभागी झाल्यानंतर नागरिकांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सहभाग नोंदवावा. त्यासाठी ‘सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करा’ हा पर्याय निवडून नाव, वय, लिंग आदी आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा उपक्रम प्रकार निवडून घराच्या स्वच्छतेनंतरचे छायाचित्र अपलोड करावे. छायाचित्र अपलोड केल्यानंतर नागरिकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि ऑनलाइन सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘माझे घर, माझी स्वच्छता; माझा सहभाग, माझी जबाबदारी’
‘माझे घर, माझी स्वच्छता; माझा सहभाग, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक कुटुंबाने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
