नियमबाह्य बांधकामाच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची लोकसेवक युवराज दाखले यांची मागणी
पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : पिंपरी भाजी मंडई शेजारील सेंट्री चाळ परिसरात वाकडकर असोसिएटमार्फत सुरू असलेल्या SRA प्रकल्पाबाबत गंभीर आक्षेप उपस्थित करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या कामाला तातडीने स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी SRA प्रशासनाकडे केली आहे.
सदर प्रकल्पामध्ये बांधकामासंदर्भातील विविध नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप दाखले यांनी केला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पाया खोदण्याच्या कामामुळे शेजारील इमारतींना तडे जात असल्याचा दावा करण्यात आला असून, स्थानिक भाजी विक्रेते, दुकानदार तसेच सेंट्री चाळीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
FSI, पर्यावरण तसेच महापालिकेच्या आवश्यक परवानग्यांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, संबंधित सर्व कागदपत्रे व परवानग्यांची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“बहुजन समाजाचा, विशेषतः मातंग समाजाचा राजकीय वापर करण्यात आला, त्याचप्रमाणे आता पिंपरीतील गरीब नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्याचा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही. क्रांतीवीर लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा समाज अन्यायाविरुद्ध लढत आला आहे आणि पुढेही लढत राहील.”
…… युवराज दाखले, युवा नेते पिंपरी चिंचवड
या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून प्रकल्पातील नियमबाह्य बाबींची पडताळणी करावी. दोष आढळल्यास संबंधित विकासकाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
