पुणे,पुरंदर प्रतिनिधी : दिवे गाव तसेच टिळेकर परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी कु. साक्षी राजेंद्र टिळेकर हिने केली आहे. औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) पदविका अभ्यासक्रमात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल साक्षीचा विशेष सन्मान करण्यात आला.
सौ. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात साक्षीचा गौरव करण्यात आला.
दिवे गावचे रहिवासी श्री. राजेंद्र दत्तात्रय टिळेकर यांची कन्या आणि श्री. गोकुळ दत्तात्रय टिळेकर यांची पुतणी असलेल्या साक्षीने आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक यशाने दिवे गावासह टिळेकर परिवाराचे नाव राज्याच्या पातळीवर उज्ज्वल केले आहे.
साक्षीने हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून बी. फार्मसीचे शिक्षण घेतले. तिच्या या यशाबद्दल परिवार, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.