पिंपरी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयवदान जनजागृती कार्यक्रम तसेच महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेल्या गुणवंत कामगारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झाल्याबद्दल पैलवान काळूराम लांडगे यांच्यासह गुणवंत कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर येथे गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, अवयवदान जनजागृती करणारे व्याख्याते श्रीकांत आपटे आणि महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगरचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे उपस्थित होते.
“अवयवदान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती होय. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयवदान अधिक श्रेष्ठ आहे. त्यामुळे गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयवदानाबाबत जनजागृती करावी.”
…..पद्मश्री गिरीश प्रभुणे.
“मृत्यूनंतर अवयवदान केल्याने अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ हे वाक्य सार्थ ठरते. अवयवदानाबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करून सकारात्मक जनजागृती करण्याचे कार्य गुणवंत कामगारांनी करावे.”
…..व्याख्याते श्रीकांत आपटे.
केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे यांनी पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांनी आगामी काळात अधिक जोमाने सामाजिक कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून त्यांना आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“गुणवंत कामगारांनी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहावे. अवयवदानाचा विचार कृतीत आणण्यासाठी प्रचार व प्रसाराची सुरुवात आपल्यापासूनच करणे आवश्यक आहे.”
….अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण.
यावेळी विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेले गुणवंत कामगार वसंत कोल्हे, काळूराम लांडगे, किरण देशमुख, बाळासाहेब साळुंके, शिवाजी पाटील आणि दत्तात्रय गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास माजी केंद्रप्रमुख सुरेश पवार, कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे, राजेश हजारे, महेंद्र गायकवाड, सुरेश कंक, अण्णा गुरव, उद्धव कुंभार, भरत शिंदे, श्रीकांत कदम, प्रकाश चव्हाण, शंकर नाणेकर, अशोक सरतापे, शिवाजी पाटील आदी गुणवंत कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन संदीप रांगोळे, पांडुरंग सुतार, डी. पी. देशपांडे, अरुण कळंबे, अक्षय काटे, कैलास पाटील, मुस्तफा मुलानी, संतोष कोरडे, नंदकुमार धुमाळ, सुरेश शेडगे, धनंजय सावंत आणि रवी मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक महंमद शरीफ मुलाणी यांनी केले. सूत्रसंचालन शिवराज शिंदे यांनी केले, तर मंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी आभार मानले.
