७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; महापालिकेच्या धडक कारवाईने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले
पिंपरी/काळेवाडी : अनधिकृत बांधकामांना लगाम घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अखेर धडक मोहीम हाती घेतली आहे. काळेवाडी येथील राजवाडेनगर परिसरात आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिकेने थेट बुलडोझर फिरवत तब्बल ७४०० चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचा प्रत्यय या कारवाईतून आला. सकाळपासूनच महापालिका अधिकारी, अभियंते, कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा
महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी शहर अभियंता, सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी व विद्युत), उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, ‘ब’, ‘क’, ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी), विद्युत व स्थापत्य विभागातील अधिकारी यांच्यासह मोठा अधिकारी-कर्मचारी वर्ग घटनास्थळी उपस्थित होता.
महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील १० कार्यकारी अभियंते, २८ उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि १६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) या मोहिमेत सहभागी झाले होते. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनीही कारवाईत सहभाग घेतला.
पोकलेन, जेसीबीने बांधकामांचा घेतला समाचार
कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. पोकलेन, ५ जेसीबी आणि २५ मजुरांच्या मदतीने अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. काही वेळातच बांधकामाचा मोठा भाग जमीनदोस्त करण्यात आला.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एम.एस.एफ. जवानांचा फौजफाटाही घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २ अग्निशमन वाहने आणि १ रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आली होती.
अनधिकृत बांधकामांवर आता ‘ब्रेक’ लागणार?
काळेवाडीतील या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन किती कठोर भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजवाडेनगरनंतर शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे धडक कारवाई होणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
