पिंपरी-चिंचवड : दहीहंडी उत्सवादरम्यान निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीम वाजविणाऱ्या मंडळे तसेच डीजे चालकांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली. ५ सप्टेंबर रोजी आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १६ डॉल्बी साऊंड सिस्टीमवर कारवाई करण्यात आली असून, डॉल्बी स्पीकर, अॅम्प्लिफायर, मिक्सर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सार्वजनिक शांतता, पर्यावरणाचे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर तसेच डीजे मालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग श्री. बसवराज तेली यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.
त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. यामध्ये निगडी पोलीस ठाणे – ४, पिंपरी – १, संत तुकारामनगर – १, दापोडी – १, हिंजवडी – १, बावधन – ३, वाकड – १, काळेवाडी – १, भोसरी – १, दिघी – १ आणि चाकण दक्षिण – १, अशा एकूण १६ डॉल्बी सिस्टीमवर कारवाई करण्यात आली.
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित साऊंड सिस्टीमचे साहित्य जप्त केले. संबंधित मंडळे व डीजे चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ
सार्वजनिक उत्सव साजरे करताना नागरिकांनी सार्वजनिक शांतता आणि पर्यावरणाचे भान ठेवावे. ध्वनिवर्धक यंत्रणेचा मर्यादित आणि नियमबद्ध वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
