पिंपरी | प्रतिनिधी……महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लोककवी सीताराम नरके लिखित ‘अजातशत्रू – अजित दादा’ या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मा. भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्व. अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकी, जनतेवरील प्रेम, कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता आणि लोकाभिमुख नेतृत्व या विविध पैलूंना या काव्यसंग्रहातील ६६ कवितांमधून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न लोककवी सीताराम नरके यांनी केला आहे.
या संग्रहातील “असे कसे गेलात हो पोरकी करून माती” ही कविता विशेष भावस्पर्शी ठरत असून, कवी नरके यांनी आतापर्यंत राज्यभरातील ६५ ठिकाणी तिचे सादरीकरण केले आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला आणि ज्या ठिकाणी स्व. अजितदादा यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ही कविता सादर करत शब्दसुमनांजली अर्पण केली. तसेच राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीतही या कवितेचे सादरीकरण करण्यात आले.
या काव्यसंग्रहासाठी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना लिहिण्याची तयारी दर्शविली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
पत्रकार रोहित खर्गे यांनी एका कार्यक्रमात कवी सीताराम नरके यांची मा. भाऊसाहेब भोईर यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यानंतर २१ जुलै रोजी झालेल्या भेटीत मा. भोईर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी कवी सीताराम नरके यांनी सांगितले की, “अजितदादा हे केवळ शब्द देणारे नव्हते, तर दिलेला शब्द पाळणारे लोकनेते होते. मी त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता असून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी माझे जीवन समर्पित करणार आहे.”
लवकरच मा. भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली “अजातशत्रू – अजित दादा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
