पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी पोहण्यासाठी गेलेल्या मुलांना अचानक उलट्या, मळमळ व अस्वस्थतेचा त्रास झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत सुमारे १० मुलांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.
यापूर्वीच्या तक्रारींवर काय कारवाई झाली?
आमदार अमित गोरखे यांनी यापूर्वी २७ जुलै २०२६ रोजी पुणे विभागीय आयुक्तांकडे संबंधित क्रीडा संकुलातील प्रशासकीय अनास्था व कार्यपद्धतीबाबत सखोल तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुलांच्या आरोग्याशी संबंधित ही घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
२७ जुलै रोजी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही करण्यात आली? कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या उपाययोजना केल्या? याची सविस्तर नोंद घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी गोरखे यांनी केली आहे.
पाण्याच्या गुणवत्तेसह सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करा
जलतरण तलावातील क्लोरीन व अन्य रसायनांचे प्रमाण, डोसिंग यंत्रणा, रसायनांची साठवणूक व हाताळणी, पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी, तपासणी अहवाल, लॉगबुक, प्रशिक्षित कर्मचारी, लाइफगार्ड, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा प्रोटोकॉल यांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी तलावातील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि त्याचे अहवाल तातडीने सार्वजनिक करावेत, असेही गोरखे यांनी म्हटले आहे.
दुर्लक्ष आढळल्यास जबाबदारी निश्चित करा
उपसंचालक स्तरावर किंवा अन्य कोणत्याही स्तरावर कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा अथवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.
“शासकीय जलतरण तलावामध्ये विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या जीविताशी व आरोग्याशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये. ३० सप्टेंबरची घटना ही केवळ एक स्वतंत्र घटना म्हणून न पाहता, या केंद्रातील संपूर्ण सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्थेचे ऑडिट केले पाहिजे. यापूर्वी या स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे,शासकीय जलतरण तलावामध्ये विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या जीविताशी व आरोग्याशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील,”
……..अमित गोरखे.आमदार,
