राहुरी फॅक्टरी परिसरातील अर्धवट रस्त्यामुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाविरोधात तीव्र संताप
राहुरी,ता. प्रतिनिधी….नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी परिसरातील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खड्डे, धूळ, चिखल आणि वाहतूक कोंडीमुळे अपघातांचा धोका वाढला असून, प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
राहुरी फॅक्टरी परिसरातील बाजारपेठ, शाळा, रुग्णालय तसेच परिसरातील गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याचे काम अर्धवट सोडल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे.
विशेषतः शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि शेतकरी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. रात्री पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत असून, रुग्णवाहिकांनाही वेळेत मार्ग काढणे कठीण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या समस्येबाबत अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कामाला अद्याप गती मिळालेली नाही. निधी उपलब्ध असतानाही काम रखडण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला असून ग्राहकांची ये-जा कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी या प्रश्नावर एकत्र येत प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. अपघाताला आमंत्रण मिळण्यापूर्वीच नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी परिसरातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा,” अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.
