अहिल्यानगर | प्रतिनिधी…सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच नागरी संरक्षण दलात विभागीय क्षेत्ररक्षक म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी श्री. चंद्रकांत भिमशा ख्याले यांना ‘राज्यस्तरीय उड्डाण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्न उडाण फाउंडेशन यांच्या वतीने भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अहिल्यानगर येथे भव्य विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चंद्रकांत ख्याले यांचा सन्मान करण्यात आला. पै. डॉ. शबनम शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुवर्णपदक विजेत्या व ऑलिम्पिक भारतीय कुस्ती प्रशिक्षक, यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी ॲड. मेहेरनाथ कलचुरे (संचालक, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट), ॲड. प्रशांतजी साळुंके (नोटरी पब्लिक, भारत सरकार व ज्येष्ठ विधीज्ञ, पुणे), सौ. जयश्रीताई शिंदे (शासनाचा राज्य युवती पुरस्कार विजेत्या), प्रा. डॉ. रमेश वाघमारे, अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, ॲड. आरती शिंदे (अध्यक्षा, उडाण फाउंडेशन), अक्षय शिंदे (सचिव), ॲड. अनिता दिघे, ॲड. दिनेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. चंद्रकांत ख्याले हे जनस्वराज सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यचे सदस्य असून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रियपणे योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक व नागरी संरक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.